संतोष येलकर / अकोला: येत्या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ५३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकांसाठी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शनिवारी निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींमध्ये ह्यमहिला राजह्ण येणार असल्याचे निश्चित झाले आहे. सन २0१५ ते २0२0 या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ५३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह), सर्वसाधारण आणि या प्रवर्गांमधील महिला इत्यादी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) एकूण १२५ सरपंचपदांपैकी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता ६३, अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या ४२ सरपंचपदांपैकी २१ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १४६ सरपंचपदांपैकी ७४ महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २२६ सरपंचपदांपैकी ११५ सरपंचांची पदे या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातल्या ५३९ ग्रामपंचायतींपैकी २७३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने, या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांवर महिलांची वर्णी लागणार आहे. उर्वरित २६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांवर पुरुषांची निवड होणार आहे; मात्र निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांवर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंचांच्या हाती येणार असल्याने, या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये महिला राज येणार आहे.
२७३ ग्रामपंचायतींमध्ये येणार ‘महिला राज’
By admin | Updated: June 8, 2015 01:41 IST