ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ : देवनार डंपिंग ग्राऊंडवर उभा राहणार प्रकल्प दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया आॅगस्टमध्ये निविदा प्रक्रिया, वर्षअखेरीस प्रकल्प मुंबई मुंबईत टनावरी वाढणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर अखेर तोडगा मिळाला आहे़ देवनार उंपिंग ग्राऊंडवर जमा होणाऱ्या तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यातून दररोज २५ ते ३० मेगावॅट वीज निर्मित होऊ शकते, असा अहवाल टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स लि़ ने पालिका प्रशासनाला सादर केला आहे़ आॅगस्ट महिन्यात निविदा प्रक्रिया सुरु करुन वर्ष अखेरीस या कामाचा श्रीगणेशा करण्यास या कंपनीने हिरवा कंदिल दाखविला आहे़ देशात अशाप्रकारचा हा पहिलाच मोठा प्रकल्प असणार आहे़ मुंबईत दररोज सुमारे नऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होत आहे़ दरवर्षी हा कचरा वाढतच असताना डंपिंग ग्राऊंडची क्षमता मात्र संपुष्टात आली आहे़
त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा यक्ष प्रश्न महापालिकेपुढे उभा राहिला आहे़ यावर चर्चा करण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांची बैठक आज बोलाविली होती़ या बैठकीत टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स लि़ने आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले़ देवनार डंपिंग ग्राऊंडवर दररोज सुमारे पाच हजार मेट्रिक टन कचरा टाकण्यात येतो़ त्यामुळे दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केल्यास २५ ते ३० मेगावॅट वीज मिळू शकेल, असा अहवाल टाटा या संस्थेने दिला आहे़ पुढच्या महिन्यात आॅगस्टमध्ये निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे़ त्यानंतर डिसेंबर महिन्यात कार्यादेश काढण्यात येणार आहेत़
* देवनार डंपिंग ग्राऊंड १२० हेक्टर्सवर असून वीज निर्मिती प्रकल्प १४ हेक्टर्स जागेवर करण्यात येणार आहे़
* देवनारमध्ये दररोज सुमारे पाच हजार मेट्रिक टनहून अधिक कचरा टाकण्यात येतो़
* या प्रकल्पाचे आयुर्मान २५ वर्षे आहे़ प्रकल्पाचा खर्च सुमारे एक हजार कोटी रुपये असणार आहे़
* कमीत कमी जागेत कचऱ्यावर अधिक प्रक्रिया करणे शक्य़
* जागतिक स्तरावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वीज निर्मिती करताना वापऱ
* कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या जगातील महत्वांच्या प्रकल्पांचा अभ्यास केल्यानंतरच हा प्रकल्प आकार घेणार आहे़