मुंबई : माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालयातील २४ मुलांना माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणाऱ्या खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. यानंतर सर्व मुलांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. दयानंद बालक विद्यालयात नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी खाण्यासाठी दिली. खिचडी खाल्ल्यानंतर शाळेतील २४ मुलांना पोटात दुखणे, मळमळ, उलट्या होणे असा त्रास जाणवू लागला. यानंतर या मुलांना तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ ते ६ मुलांना जास्त त्रास जाणवत होता. त्यांना उलट्या आणि जुलाब होत होते. इतर मुलांना पोटात दुखत होते. सात जणांना सलाइन लावण्यात आले. या शाळला प्रियदर्शिनी निराधार महिला सहाय मंडळातर्फे खिचडी देण्यात येते. मंडळाचे मालक केदार ओसवाल यांची माटुंगा पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)
माटुंग्यात २४ मुलांना खिचडीत विषबाधा
By admin | Updated: January 14, 2015 05:00 IST