ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६- तीन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बाँबस्फोटांसाठी इंडियन मुजाहिदीनला आर्थिक रसद पुरवणा-या अब्दूल मतीनला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गोव्यातून अटक केली आहे. मतीनने यासीन भटकळला पैसे पुरवल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.
इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने १३ जुलै २०११ मध्ये मुंबईतील झवेरी बाजार, दादर आणि करीरोड या भागांमध्ये तीन साखळी स्फोट घडवून आणले होते. यात सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला होता. मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळने हे बाँबस्फोट घडवले होते. बाँबस्फोट घडवण्यासाठी यासीनला अब्दूल मतीनने आर्थिक मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. मतीनने दुबईतून हवालाद्वारे आर्थिक मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी मतीनविरोधात लुकआऊट नोटीसही काढली होती. बुधवारी एटीएसने गोवा येथून मतीनला अटक केली. याप्रकरणातील आरोपी यासीन भटकळ याला काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती.