मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा न काढताच १८.९० कोटी रुपयांचे ध्वनिरोधकाचे काम जारी केल्याची माहिती समोर आली आहे.सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये ही माहिती प्राप्त झाली आहे. एमएमआरडीए आयुक्त यू.पी.एस मदान यांना याबाबत तक्रारदेखील करण्यात आली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने सरकारी नियम आणि निविदा प्रक्रियेला डावलत अतिरिक्त कामाच्या नावावर रस्ते कंत्राटदार जे कुमार याला सरळ १८.९० कोटींचे काम दिले आहे, ज्याला सेंट्रल रोड रिसर्च एजन्सी (सीआरआरआय)ने काम देण्याची शिफारस केली होती. उड्डाणपुलाच्या कामाच्या दोन वर्षांनंतर प्राधिकरणाने सीआरआरआयला ध्वनिमोजणी करण्याचे काम दिले. डॉ. आंबेडकर मार्गावरील सायन रुग्णालय, किंग्ज सर्कल-तुळपुले चौक आणि हिंदमाता उड्डाणपूल या विविध उड्डाणपुलासाठी ध्वनिरोधकाचे काम देताना निविदा न काढता प्राधिकरणाने जे कुमार या कंत्राटदारावर मेहरनजर दाखविली. यापूर्वी जे कुमार याला दहिसर रेल्वे ओलांडणी पुलावर रुपये ५.७४. कोटींचे काम निविदा न काढताच दिले होते. (प्रतिनिधी)
निविदेविनाच १८.९० कोटी रुपयांचे काम !
By admin | Updated: April 23, 2015 05:34 IST