मुंबई : काँग्रेससोबत असलेली १५ वर्षांपासूनची आघाडी तोडत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केला. समविचारी पक्षांशी आघाडी करून आम्ही काँग्रेसशिवाय विधानसभेची निवडणूक लढविणार आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीच्या या पवित्र्यानंतर काँग्रेसनेही आम्ही स्वबळावर सत्तेत येणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे. महायुतीमधील शिवसेना-भाजपा या दोन पक्षांचा घटस्फोट होताच, राष्ट्रवादीने आपले पत्ते बाहेर काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री राजभवनला जाऊन आघाडी सरकारला राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा काढत असल्याचे पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना दिले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्यपाल केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगू शकतात. आजवर विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी आमचे चांगले संबंध होते. त्यांच्याशी वारंवार चर्चा व्हायची. पण हा संवाद अलीकडच्या काळात खुंटला होता, असा आरोप खा. प्रफुल्ल पटेल यांनी केला.
१५ वर्षांची आघाडी फुटली
By admin | Updated: September 26, 2014 08:35 IST