बेळगाव : तब्बल २१ तासांची गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडूनदेखील शहराला वादाचे ग्रहण लागले. सोमवारी दुपारी मिरवणूक शांततेत पार पडल्यावर पोलीस आणि जनतेनेही नि:श्वास सोडला होता, पण सोमवारी रात्री खडक गल्ली व परिसरात समाजकंटकांनी तुफान दगडफेक करून वाहनांची मोडतोड करत ती पेटवली. दंगलीत पोलिसासह सहाहून अधिकजण जखमी झाले. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. दंगलीचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले नाही. शंभर ते दीडशेजणांच्या जमावाने तुफान दगडफेक करून दहशत माजवली. पेट्रोल बॉम्ब, दगड, बाटल्या, स्टम्प यांचा दंगलखोरांनी वापर केला. पोलीस, पोलीस ठाणे आणि घरांवरदेखील दगडफेक केली. पोलीस आल्यावरही पाऊण तासाहून अधिक काळ दगडफेक सुरूच होती. दंगलखोरांना आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रात्री अचानक दगडफेक सुरू झाल्यामुळे खडक गल्ली आणि कचेरी रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. उत्तर विभाग वाहतूक पोलीस ठाण्यावरही दगडफेक केली. दंगलीचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त एस. रवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार व छायाचित्रकारांना आयुक्तांनी निघून जाण्यास सांगितले. सोमवारी रात्री खडक गल्ली येथे पत्रकार व पोलीस आयुक्त यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. दगडफेकीमुळे संतप्त महिला रस्त्यावर आल्या. उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक उमेशकुमार यांनीदेखील रात्री खडक गल्ली परिसराला भेट दिली.
बेळगाव दंगलप्रकरणी १५ जणांना अटक
By admin | Updated: September 30, 2015 01:08 IST