पुणे : जमिनी संरक्षणाबरोबर आरमारी सज्जतेसाठी संरक्षण मंत्रालयाने संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीवर अधिक भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) पाणबुडीसाठी एक नवे तंत्रज्ञान विकसित करीत आहे. याद्वारे पाणबुडी आता १५ दिवस पाण्याखाली राहू शकेल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागाचे सचिव व संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. अविनाश चंदर यांनी दिली.पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या (डाएट) कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आरमारी सिद्धता वाढविण्यासाठी फ्रान्सकडून सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या ६ अत्याधुनिक पाणबुड्या घेण्यात येणार आहेत. यातील पहिली पाणबुडी पुढच्या वर्षी दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर प्रत्येक वर्षात एक अशा पाणबुड्या दाखल होतील, असे डॉ. चंदर म्हणाले.फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या पाणबुड्यांवर हे तंत्रज्ञान लावण्यात येणार आहे. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे पाणबुडीला आॅक्सिजन घेण्यासाठी २४ तासांत एकदा सागरी पृष्ठभागावर यावे लागते. मात्र या नव्या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे एकदा आॅक्सिजन घेतल्यानंतर पाणबुडी १५ दिवस खोल पाण्यात राहू शकेल, असे त्यांनी सांगितले.
आता पाणबुडी घेणार १५ दिवसांचा ‘श्वास’
By admin | Updated: December 27, 2014 04:44 IST