ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - एलआयसी पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्यावरचा कर वाचवण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी १३ लाख १ हजार ३०८ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शर्मा, भाटीया आणि सिन्हा (रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ८० वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ज्येष्ठ नागरिकाला आरोपींनी एप्रिल २०१५ मध्ये मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यांना आपण एलआयसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत मुलीची पॉलिसी पूर्ण झाली असून, त्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगत त्यावर करामधून मोठी कपात होणार असल्याची भीती त्यांना घातली.
हा कर वाचवायचा असल्यास नवीन पॉलिसी काढल्यास त्यावर अधिक फायदा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार ज्येष्ठाने त्यांच्या मुलीच्या बँके खात्यातून १३ लाख १ हजार ३०८ रुपये आरोपींच्या खात्यावर वर्ग केले.