नेरळ : कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात तेथील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातील नेरळ-माथेरान घाटात असलेल्या १२ आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा कर्जत तालुका आदिवासी संघटनेने दिला आहे.माथेरानच्या मधल्या पट्ट्यात नेरळच्या जुम्मापट्टीपासून कर्जतच्या किरवलीपर्यंत १२ आदिवासी वाड्या आहेत. त्यातील सर्व वाड्या या उंच भागात वसल्या असल्याने तेथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. बेकरेवाडी,आसलवाडी, नान्याचामाळ, मन्याचामाळ, मना धनगरवाडा, सागाचीवाडी, चिंचवाडी, भूतिवलीवाडी, आषाणेवाडी, सावरगाव, किरवलीवाडी, धामनदांड,या १२ आदिवासी वाड्या माथेरानच्या मध्यावर वसल्या आहेत. वन विभागाच्या दळी जमिनीवर वसलेल्या या सर्व वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येत नाही. त्यामुळे रस्त्याअभावी तेथे पाणीटंचाई काळात टँकर देखील सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनासमोर तेथे पाणीपुरवठा करण्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या स्थितीत स्थानिक आदिवासी लोकांनी दाहीदिशा भटकत राहायचे का, हा प्रश्न अधांतरी आहे. परंतु आदिवासी लोकांनी पाणी न पिता तडफडून मरायचे का, असा प्रश्न कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शासनाने तेथे टँकर सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर )
१२ आदिवासी वाड्यांत पाणीटंचाई
By admin | Updated: April 28, 2016 03:23 IST