मुंबई : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मुंबईत वाढत आहे. सोमवारी (९ फेब्रुवारी) मुंबईत स्वाइन फ्लूचे ५ तर मंगळावारी (१० फेब्रुवारी) ११ रुग्ण आढळून आले आहेत. तर स्वाइन फ्लूचा एक रुग्ण मुंबईबाहेरून मुंबईत उपचारासाठी दाखल झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली. दरम्यान, जसलोक रुग्णालयात सोमवारी मध्यरात्री एका स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवासांत मुंबईत स्वाइनचे ३१ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई बाहेरचे २३ रुग्ण मुंबईत उपचार घेत आहेत. मंगळवारी आढळलेल्या १२ स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सात महिला आहेत. यातील कोणत्याही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही. ठाणे पश्चिम येथील ७९वर्षीय पुरुष, सांताक्रुझ पूर्व येथील ५९ वर्षीय महिला, कांदिवली पूर्व येथील ४३ वर्षीय पुरुष आणि वर्साेवा येथील ३३ वर्षीय महिला या चौघा रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. कांदिवली पश्चिम येथील ३८ वर्षीय पुरुष, वांद्रे पश्चिम येथील ८१ वर्षीय पुरुष आणि गोवंडी येथील २४ वर्षीय मुलीवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालाड पश्चिम येथील २९ वर्षीय महिला, विक्रोळी येथील २५ वर्षीय मुलगी, दादर पूर्व भागातील ५९ वर्षीय महिला, घाटकोपर पूर्व भागातील ३५ वर्षीय पुरुष आणि जुहू येथील १० वर्षीय मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईत स्वाइन फ्लूचे नवीन १२ रुग्ण
By admin | Updated: February 11, 2015 06:23 IST