मुंबई : महापालिकेच्या ‘बी’ विभागातील केशवजी नाईक मार्गावरील ११ मजली अनधिकृत इमारत अतिशय काळजीपूर्वक आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना व रेल्वे वाहतुकीला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता अत्यंत दक्षतेने जमीनदोस्त करण्यात आली. ७ आॅगस्ट २०१६ पासून ही इमारत पाडण्याचे काम महापालिकेकडून सुरू होते.‘बी’ विभागाचे साहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी या प्रकरणामध्ये इमारत व कारखाने तसेच विधी खाते यांच्या साहाय्याने न्यायालयास ही इमारत अनधिकृत असून व महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय बांधली असल्याचे पटवून दिले. शिवाय स्थगितीचे आदेश रद्द करून निष्कासन प्रक्रियेला सुरुवात केली. ही अनधिकृत इमारत दाटीवाटीच्या लोकवस्तीत असून बी विभाग संवेदनशील असल्याकारणाने कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता निष्कासन कारवाई करताना विशेष काळजी घेण्यात आली. ८ आॅगस्ट २०१६ रोजीच्या कारवाईदरम्यान इमारतीत रहिवासी स्थायिक होते. ठेकेदाराच्या कामगारांच्या मदतीने रहिवाशांचे साहित्य बाहेर काढण्यात आले. अनधिकृत इमारत ही रेल्वे रुळापासून नजीक असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून येथील विभाजक भिंतही पाडण्यात आली. कोणालाही इजा होऊ नये याकरिता परांची, सेफ्टी नेट्स बांधणे ही आव्हानात्मक कामे करावी लागल्याने कारवाईस उशीर झाल्याचेही महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
११ मजली इमारत जमीनदोस्त
By admin | Updated: March 6, 2017 02:44 IST