सुनील काकडे/वाशिम : पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात ४ जुलै रोजी झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण मोहिमेत आढळलेल्या १११३ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास २७0 मुलांना शाळेत दाखल करुन घेतल्याची माहिती या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अ. ज. सोनवणे यांनी बुधवारी दिली. महाराष्ट्र शासन शिक्षण मंडळाच्या आदेशान्वये ४ जुलै रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात वाशिम जिल्ह्यात १३८, बुलडाणा जिल्ह्यात ६६७, तर अकोला जिल्ह्यात ३0८ शाळाबाह्य मुले आढळून आली. दरम्यान, या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, तिन्ही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकार्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून शाळाबाह्य मुलांचे आधारकार्ड काढून देणे, त्यांना सोयीची ठरेल अशा जवळच्या शाळेत प्रवेश देणे, तसेच शासनस्तरावरुन शिक्षणासंदर्भात पुरविल्या जाणार्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अकोला मनपाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य सर्वेक्षण मोहिमेत ९३ मुले शाळाबाह्य आढळली; तर अकोला ग्रामीण विभागात २१५ मुलांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी जवळपास ९0 टक्के मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया आटोपल्याची माहिती शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षी ५४७ शाळाबाह्य मुले होती; त्यात यंदा वाढ झाली असून ६६७ मुले शाळाबाह्य आढळली आहेत. त्यात ३६४ मुले मध्येच शाळा सोडणारी असून ३0३ मुले जन्मापासूनच शाळाबाह्य असल्याची माहिती बुलडाणा शिक्षणाधिकारी वैशाली त्रग यांनी दिली. वाशिम जिल्ह्यात १३८ शाळाबाह्य मुले असून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांनी सांगितले.
१११३ शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात!
By admin | Updated: July 16, 2015 01:58 IST