अजित मांडके, ठाणेमिशन कालावधीत बीएसयूपीच्या (बेसिक सर्व्हिस फॉर अर्बन पुअर) सदनिका उभारणीची कामे पूर्ण न झाल्याने आता या कामासाठी मुदतवाढ मिळावी, म्हणून पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. परंतु, दुसरीकडे काही ठिकाणी जागा न मिळाल्याने, चार टप्प्यांतील सात हजार ७४५ सदनिकांपैकी एक हजार १९६ सदनिका आणि संक्रमण शिबिरांच्या २९३ खोल्या रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी पालिकेला मिळालेले केंद्र आणि राज्य सरकारचे १५ कोटी ९३ लाख सव्याज परत करावे लागणार आहेत. ठाणे महापालिका हद्दीत २००५ मध्ये बीएसयूपी योजनेअंतर्गत चार विकास प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यानुसार शहराच्या सदनिका उभारणीची कामे हाती घेतली आहेत. त्याचा मिशन कालावधी सुरवातीला २०१४ निश्चित केला होता. परंतु, नंतर पुन्हा त्यात वाढ करून ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत आतापर्यंत एमएमआरडीए, तुळशीधाम येथे २ हजार १३४ सदनिकापैकी १३०० सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. ८३४ सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. सिद्धार्थनगर कोपरी येथे ६८८ पैकी ३५० सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. खारटन रोड येथे १६० पैकी ९६ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. वर्तकनगर येथील इमारत क्र मांक ५४, ५५ आणि ५६ येथे बांधण्यात येणाऱ्या २७० सदनिका स्थलांतरित करून टेकडी बंगला व राबोडी येथे त्या उभारण्यात येणार आहेत. माजिवडयाच्या ५३२ सदनिकापैकी पडले गाव व राबोडी येथे अनुक्रमे १३२ व २०० सदनिकांचे काम होणार आहे. तर २४० सदनिका रद्द करण्यात येणार आहेत. अंतिम भूखंड ७० येथे बांधण्यात येणाऱ्या २७० सदनिका रद्द करण्यात येणार आहेत. तर महात्मा फुले नगर येथीलही २७० सदनिका रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. एकूण प्रकल्प १ मध्ये ४ हजार ६२१ सदनिकांपैकी ६४८ सदनिकाचे काम रद्द होणार आहे. प्रकल्प तीन मध्ये आनंदनगर येथे बांधण्यात आलेल्या ११६० सदनिकापैकी ५४८ सदनिका रद्द कराव्या लागणार आहेत. प्रकल्प चारमध्ये डायघर व कौसा येथे बांधण्यात येणाऱ्या ११४२ सदनिका पडले, राबोडी, महात्मा फुलेनगर येथे स्थलांतरित कराव्या लागणार आहेत.तीन प्रकल्पांचा एकूण खर्च ५४१ कोटी ८ लाख ५१ हजार असून आतापर्यंत २२० कोटी ४ लाख ५९ हजार खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यास ३२१ कोटी ३ लाख ९२ हजार अधिक भाववाढ इतका निधी आवश्यक आहे.
१,१९६ घरांना तिलांजली
By admin | Updated: January 14, 2015 04:53 IST