मुंबई : नोटाबंदीनंतर सोन्यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतविल्याचे उघड झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी झवेरी बाजारातील तीन बड्या ज्वेलर्सवर छापे मारले. हजार व पाचशेच्या रद्द झालेल्या नोटा घेऊन या ज्वेलर्सने १०० कोटींपेक्षा जास्त काळा पैसा पांढरा करून दिल्याची प्राप्तिकर विभागाची माहिती आहे. त्या दिशेने या ज्वेलर्सची सकाळपासून चौकशी सुरू होती.चेनाजी नरसिंहजी ज्वेलर्स, देव बुलियन आणि श्री बुलियन यांच्यावर शुक्रवारी सकाळीच प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोन्यामध्ये काळा पैसा गुंतवण्यात आल्याचे वास्तव ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून उघड केले होते. या तीन ज्वेलर्सच्या मालकांनी सोन्याच्या विक्रीतून आलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा त्यांच्या दुकानांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्या. त्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी धनादेश घेतल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासात समोर आले. परंतु सोन्याची योग्य मार्गाने विक्री करून हा पैसा मिळाल्याचा दावा ज्वेलर्सनी केला आहे. मात्र त्याचा समाधानकारक हिशोब त्यांनी दिलेला नाही.शुक्रवारी सकाळी या ज्वेलर्सनी दुकाने उघडताच प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली. सुमारे १०० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा संशय या ज्वेलर्सवर असून ही रक्कम आणखी अधिक असू शकते, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)चार लाख कोटी रुपये काळे धन जमा?नोटाबंदीच्या निर्णयानंतर म्हणजे ८ नोव्हेंबरपासून २९ डिसेंबर या काळात बँकांच्या विविध शाखांतील खात्यांत ४ लाख कोटी रुपये इतकी अघोषित रक्कम जमा झाल्याचा प्राप्तिकर विभागाचा अंदाज आहे.
१०० कोटींचे काळ्याचे पांढरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 05:00 IST