गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा : प्रशांत वासनकरचे नोंदविले बयाणअमरावती : गुंतवणुकीच्या योजनेतून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या वासनकर समूहातील सदस्यांच्या बँक खात्यात १०० कोटींची रक्कम असल्याचे आरोपी प्रशांत वासनकर याने पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. नागपूर येथील वासनकर समूहातील सदस्यांनी १९८९ मध्ये वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली होती. गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट व तिप्पट करण्याचे आमिष दाखवून ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत होते. मात्र यामध्ये त्या कंपनीत अधिक लाभ न झाल्याने वासनकर बंधूंनी दुसऱ्या कंपनीची स्थापना केली होती. वेल्थ मॅनेजमेंट कंपनी उघडून पुन्हा गुंतवणूकदारांकडून वासनकर समूहातील सदस्यांची पैसे गोळा करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. या कंपनीला सेबी (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड) यांचीसुध्दा परवानगी होती. त्या माध्यमातून वासनकर समूहातील समस्यांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. वासनकर समूहाने विविध योजनांतून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले व गुंतवणूकदारांना बंद झालेल्या कंपनीच्या पावत्या ते देत होते. त्यांच्या रेकॉर्डवर नागरिकांकडून कर्ज घेतल्याचे दर्शवित होते. मात्र वासनकर समूहाला नागरिकांकडून कर्ज घेण्याचा अधिकारी नव्हता, असे आरोपी प्रशांत वासनकर याने पोलीस चौकशीदरम्यान सांगितले. पीडित गुंतवणूकदारांनी वासनकर समूहाविरोधात फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस विभागाकडे नोंदविली. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी चौकशी सुरु केली आहे. प्रशांत वासनकर यांच्या खासगी बँक खात्यामध्ये १०० कोटी रुपये जमा आहेत आणि तो पैसा गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आहे, असा दावा प्रशांत वासनकर यांनी केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली. (प्रतिनिधी)वासनकर कंपनीत ४ हजार ५०० गुंतवणूकदार विदर्भातील अनेक नागरिकांनी वासनकर कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. तक्रार होण्यापूर्वी वासनकर समूहात ४ हजार ५०० नागरिकांनी पैसे गुंतवणूक केली आहे. दरम्यान नागपूर पोलिसांनी वासनकर समूहाचे ५६ बँक खाते सील केले. तसेच २६ ठिकाणची संपत्ती जप्त केली आहे. बुधवारी वासनकर समूहातील तीनही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे.
वासनकर बंधूच्या बँक खात्यात १०० कोटी
By admin | Updated: November 18, 2014 00:49 IST