जामनेर (जि.जळगाव) : जलसंपदा खात्यात झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर निधी अभावी रखडलेल्या अकराशे कोटी रुपयांची कामे थांबविण्याचे आपण आदेश दिले होते. ही कामे सुरु करावीत, यासाठी ठेकेदारांनी आपल्याला शंभर कोटी रुपयांची आॅफर दिली. मात्र आपण ती धुडकावली, असा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे शनिवारी केला. जामनेर तालुक्यात मरुखेडा फाट्याजवळील आॅईल मिलमध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जलसंपदा विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. रायगड जिल्ह्णातील कोंढणे प्रकल्पाचे ७० कोटींचे काम सहा महिन्यांत न करता त्याला ३७२ कोटींची वाढीव मंजुरी घेवून त्याच ठेकेदाराला दिले गेले. यासाठी कोणाची परवानगी घेतली गेली नाही. ७० कोटीवरुन ७०० कोटीपर्यंत काही कामे गेलेली आहे. या सर्व गैरव्यवहारांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. आदेश निघताच ठेकेदारांनी आपल्याला गळ घातली आणि शंभर कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला़ भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी कुठलीही तडजोड आपण करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठेकेदाराकडून शंभर कोटींची लाच!
By admin | Updated: December 28, 2014 01:34 IST