वैष्णव भक्तांसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांची सेवा
ऑनलाइन लोकमत
अकलूज, दि. ११ - जात, पंथ, स्पृश्य-अस्पृश्य अशा भेदभावाचे अमंगळ दूर सारून, निर्गुण निराकार आणि सगुण साकार असणा-या पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवण्यास निघलेल्या, वैष्णव भक्तांच्या सेवेसाठी अकलूज व परिसरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे.
रविवार, दि. १० जुलै रोजी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. तत्पूर्वी शनिवार, दि. ९ जुलै रोजी अनेक वारकरी अकलूजकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होत असतात. अशा वारकºयांची सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून घडावी, अशी कल्पना संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी मांडली. या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे कार्य संचालक संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले. संस्थेतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी आपल्या घरून २० हजार चपाती व भाकरी एकत्र केल्या.
संस्थेतील शिक्षकवृदांनी स्वखर्चातून झुणका तयार केला. देणाºयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी या उक्तीप्रमाणे १० हजार घरांतून आलेला अन्नाचा घास हजारो वैष्णव भक्तांना देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे एनसीसी, स्काऊट गाईड, आरएसपीचे विद्यार्थी, मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, महर्षी शंकरराव प्रशाला यशवंतनगर, अकलाई विद्यालय, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी दुपारी ३ वा.पासून परिश्रम घेत होते. सदर उपक्रमाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व संचालिका स्वरूपराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, मुख्याध्यापक पी. एस. पाटील, मुख्याध्यापिका मंजुश्री जैन, मुख्याध्यापक लालासाहेब मगर, मुख्याध्यापक पांडुरंग वठारे, मुख्याध्यापिका सुशीला होनमाने, उपमुख्याध्यापक डी. के. घंटे, उपप्राचार्य विलास घाडगे, संजय राऊत, पर्यवेक्षक एस. टी. वाघ, सी. ए. मुलाणी, यु. आर. शेलार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)