कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णू गायकवाड याच्या दोषारोपपत्र निश्चितीवर दहा आॅक्टोबर २०१६ ला सुनावणी होईल, असे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी सुनावणीवेळी सांगितले. या सुनावणीवेळी संशयित समीर गायकवाड हजर होता.पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला १६ सप्टेंबर २०१५ ‘एसआयटी’ने अटक केली आहे. या प्रकरणी डिसेंबर २०१५ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे पण, दोषारोपपत्राची निश्चिती झालेली नाही. दरम्यान, सोमवारी दुपारी कोल्हापूर येथील कसबा बावडा न्यायसंकुलामधील बिले यांच्या न्यायालयात समीरच्या दोषारोपपत्र निश्चितीबाबत सुनावणी होती. या सुनावणीसाठी राजारामपुरी पोलिसांनी गायकवाडला न्यायालयात हजर केले. त्याचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी, उच्च न्यायालयात दोषारोपपत्र निश्चितीबाबत सात आॅक्टोबरला सुनावणी असल्याचे सांगितले. त्यावर दोषारोपपत्र निश्चितीवर जिल्हा न्यायालयात दहा आॅक्टोबरला सुनावणी होईल, असे बिले यांनी सांगितले. सुनावणीवेळी अॅड. विवेक घाटगे, मेघा पानसरे, दिलीप पवार, शिवानंद स्वामी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोषारोपपत्रावर १० आॅक्टोबरला सुनावणी
By admin | Updated: September 27, 2016 02:00 IST