बदलापूर : बदलापूर एमआयडीसीतील स्टेट बँकेची शाखा फोडून कोट्यवधीचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांपैकी १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने तसेच चोरीच्या पैशांतून खरेदी केलेली मोटारसायकल, मोबाइल फोन व गुन्ह्यांसाठी वापरलेली गाडी हस्तगत केली आहे.राजू ऊर्फ राजू सोनार, गणेश पावना सिंग, मोहंमद ताहीर कसमुल, रोशन वासुदेव वारसे, सरफराज अहमद मोहंमद आयुब, मिथुन शेख, मनुराज ऊर्फमुन्ना समरूद्दीन शेख, जमील भिखा शेख, शाबीर कलीमउद्दीन शेख, अमीर हमजा अली हुसेन शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यापैकी राजू सोनार हा उल्हासनगर येथे, गणेश सिंग हा नेपाळ येथे, मोहंमद ताहीर कसमुल शेख हा पश्चिम बंगाल येथे तर रोशन वारसे हा वांगणी येथे राहणारा आहे. उर्वरित सर्व आरोपी झारखंडमधील आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मास्टरमाइंडसह आणखी ४ आरोपी मात्र अद्याप फरारी आहेत.