काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका डॉक्टराची व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात संबंधित डॉक्टराने मुस्लीम रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला.
डॉ. नेहा अरोरा वर्मा यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये इंदूर येथील एका डॉक्टरने गुडघ्यांवर उपचार घेणाऱ्या मुस्लिम महिला रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. स्क्रीनशॉटनुसार, डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात की, आम्ही आता कोणत्याही मुस्लिम रुग्णांवर उपचार करणार नाही. कृपया तुमच्या परिसरातील चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्या.' हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. हा मेसेज रुग्णाच्या धर्माला लक्ष्य करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांचा संताप पाहून डॉ. नेहा यांनी पोस्ट डिलिट केली. परंतु, तोपर्यंत हा स्क्रीनशॉट वेगाने व्हायरल झाला.
या स्क्रीनशॉटबाबत बोलताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'संबंधित व्यक्तीला डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी देऊ नये. त्याचा परवाना रद्द करण्यात यावा.' दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले पाहिजेत, मग त्यांचा धर्म काहीही असो. डॉक्टर कोणत्याही धर्मातील रुग्णाला नका देऊ शकत नाही.' या घटनेने वैद्यकीय नीतिमत्ता आणि धार्मिक भेदभावाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोग्य अधिकारी किंवा स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही.