जगदीश विजय किवंडे (१९, रा. गांधीनगर, उदगीर) असे मयत युवकाचे नाव आहे. उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, आरोपी सोन्या नाटकरे व मयत युवक जगदीश किवंडे यांच्यात गुरुवारी रात्री ९.४५ वा.च्या सुमारास रेल्वे स्टेशनसमोरील महात्मा बसेश्वर चौकाच्या बाजूस रागाने का बघितले? म्हणून वाद झाला. तेव्हा आरोपी नाटकरे याने कमरेचा चाकू काढून त्याच्या पोटावर मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे जगदीशला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
शुक्रवारी पहाटे २ वा.च्या सुमारास मयत युवकाची आई सुनीता विजय किवंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ३०२ चे कलम वाढविण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी सांगितले. घटनेतील आरोपी फरार झाला आहे.