लातूर : क्रिकेट खेळ सर्वांच्या आवडीचा. या खेळाची लोकप्रियता असल्याने पालक वर्गही आपल्या पाल्यास क्रिकेटसाठी प्रोत्साहित करतात. टीव्हीवरही ग्रीन टॉपवर सामने पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र खेळाडूंच्या दृष्टीने विचार केला तर खेळाडूंना टर्फ विकेट् व ग्रीन टॉपवर खेळण्याची मनोमन इच्छा असते. लातुरातही हे शुक्रवारी अनुभवास मिळाले. निमित्त होते, निमंत्रितांच्या निवड चाचणी स्पर्धेचे. प्रथमच दयानंद शिक्षण संस्थेच्या क्रिकेट मैदानावर खेळाडूंना रोमांच अनुभवता आला. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला.
निमंत्रितांच्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन शुक्रवारी दयानंद शिक्षण संस्थेच्या क्रिकेट मैदानावर करण्यात आले होते. या दरम्यान, प्रथमच शहरात क्रिकेट संघटनेच्या वतीने टर्फ विकेट्वर निवड चाचणी घेण्यात आली. पूर्वी शहरात परिपूर्ण असे टर्फ विकेटचे मैदान नव्हते. त्यामुळे खेळाडूंना शहराबाहेर असलेल्या एमसीएच्या साखरा येथील स्टेडियमचा आधार घ्यावा लागत होता. कालांतराने हे मैदानही बंद पडले. त्यामुळे परत नवोदित खेळाडूंना मॅटवरच निवड चाचणीसाठी आपले कौशल्य सिद्ध करावे लागत असे. राज्य स्पर्धा टर्फ विकेट्वर अन् सराव तसेच निवड चाचणी मॅटवर अशा संकटातून अनेकदा लातूरचे खेळाडू गेले आहेत. आता नव्याने टर्फ विकेट्सह ग्रीन टॉप मैदान झाल्याने लातूरच्या खेळाडूंची शहरातच सोय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वाला बळकटी मिळाली आहे. एकंदरित, युवा खेळाडूंसाठी आपले कौशल्य शहरातील मैदानावर दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे युवा खेळाडूंच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद पहावयास मिळाला.
७७ खेळाडूंनी दाखविली चुणूक...
मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी झालेल्या निवड चाचणीत जिल्ह्यातील ७७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यातील ३० खेळाडूंची निवड सराव शिबिरासाठी करण्यात आली आहे. निवड समिती सदस्य म्हणून प्रा. भरत चामले, प्रा. महेश बेंबडे, श्रीनिवास इंगोले, विकास निरफळ यांनी काम पाहिले.
ग्रामीण खेळाडूही झाले प्रोत्साहित...
या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलही खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. प्रथमच टर्फ विकेट्वर खेळत असल्याने अनेकांची घसरगुंडी झाली. स्पाईक शूज नसल्याने ही अडचण आली. मात्र मैदान पाहून व त्यावरील खेळण्याचा आनंद घेऊन भविष्यात स्पाईक शूज खरेदी करून क्रिकेट खेळाचा आनंद घेऊ, असेही काही खेळाडूंनी सांगितले.