हरंगुळ रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळेना
लातूर : शहरानजीक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्तादुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून केली जात असून, संबंधित विभागाकडे निवेदनही देण्यात आले. रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे सदाशिवनगर, गोविंदनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दुभाजकांत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यामधील दुभाजकांत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्यापारी तसेच दुकानदार दुभाजकामध्ये कचरा टाकत आहेत. परिणामी, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या महिनाभरापासून दुभाजकातील कचरा उचलला नसल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित यंत्रणेने तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील बाजारात आंब्याची आवक
लातूर : शहरातील फळबाजारात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी ७ ते ११ ही वेळ अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी देण्यात आली असल्याने अनेक नागरिक आंबाखरेदीला प्राधान्य देत आहेत. केशर, गावरान, हापूस, देवगड, आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, विक्रीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर आंब्यांना मागणी वाढेल, असे फळविक्रेत्यांनी सांगितले.
वाढत्या उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट
लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. अनेक नागरिकांनी वाढत्या उकाड्यामुळे कूलर, पंख्यांचा आधार घेतला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे कुलर विक्री तसेच दुरुस्तीची दुकाने बंद असल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली आहे.
शेती मशागतीच्या कामांना आला वेग
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने शेती मशागतीची कामे केली जात आहे. नांगरणी, मोगडणीसोबतच खते आणि बियाण्यांचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, या वर्षी पावसाचे लवकर आगमन होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला लागले असून, यंदा चांगली उत्पादन वाढ होईल, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
अनुदानासाठी रिक्षाचालकांनी अर्ज करावेत
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने परवानाधारक ऑटो रिक्षाचालकांना १५०० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे निधीही वर्ग करण्यात आला आहे. अनुदान वितरणासाठी प्रणाली विकसित करण्यात आली असून, जिल्ह्यातील ऑटो रिक्षाचालकांनी आरटीओच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज सादर केल्यानंतर अनुदान वितरित केले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक होत आहे. आवक स्थिर असल्याने दरही कमी आहेत. टोमॅटो, वांगे, मिरची, लसूण, कोबी, पालक, शेपू, मेथी यासोबतच विविध भाजीपाला विक्रीसाठी दाखल होत आहे. दरम्यान, काेरोनामुळे खरेदीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद असल्याने अनेक व्यापारी, किरकोळ विक्रेते शहरातील विविध भागांत हातगाडीद्वारे भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. दरम्यान, घरपोच भाजीपाला मिळत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.