शाॅर्टकटसाठी राँग साईडने वाहन चालविणे अनेकांना अंगलट आले आहे़ हे टाळणे गरजेचे आहे, अन्यथा वेळेची बचत जीवघेणी ठरण्याची शक्यता आहे. लातुरातील गांधी चाैक ते गंजगाेलाई, सुभाष चाैक, राजर्षी शाहू महाराज चाैक, कव्हा नाका, बाजार समिती परिसर, गूळ मार्केट चाैक ते बसस्थानक, जुने रेल्वेस्थान, मिनी मार्केट काॅर्नर, अशाेक हाॅटेल, औसा राेड आणि जुना रेणापूर नाका परिसरात माेठ्या प्रमाणावर चुकीच्या दिशेने जाताना वाहनधारक दिसून येतात. यातून दररोज छाेट्या-माेठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत.
या मार्गावर माेठ्या प्रमाणावर ‘राँग साईड’ प्रवास...
१ बसस्थानक परिसर...
लातुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात माेठ्या प्रमाणावर राँग साईडचा वापर वाहनधारक करतात.
चालकांचा शाॅर्टकट...
बसस्थानक परिसरातील रस्ता ओलांडण्यासाठी माेठा वळसा घालावा लागताे. परिणामी, वाहनधारक चुकीच्या दिशेचा वापर करत असल्याचे दिसून आले. यातून अपघाताच्या घटना घडत आहेत.
पाेलिसांचे दुर्लक्ष...
बसस्थानक परिसर माेठ्या वर्दळीचे ठिकाण आहे. छाेट्या-माेठ्या वाहनांनी दिवसभर येथे वाहतूक काेंडी हाेते. याकडे वाहतूक शाखेच्या पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.
२ गंजगाेलाई परिसर...
गांधी चाैक ते गंजगाेलाई हा प्रमुख मार्ग एकेरी मार्ग आहे. एकदा या मार्गावर आलेल्या वाहनाला गंजगाेलाईला वळसा घालूनच जावे लागते. परत फिरण्याची येथे सोय नाही़
वेगवान वाहनधारक...
प्रमुख मार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग माेजण्याची यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. निर्धारित वेगापेक्षा अधिक वेग असलेली वाहने या मार्गावर धावताना दिसून येतात. यातून अपघात हाेत आहेत.
कारवाईची गरज...
गांधी चाैक ते गंजगाेलाई या मार्गावर केवळ हनुमान चाैकात वाहतूक शाखेचे पाेलीस दिसून येतात. त्यापुढे गंजगाेलाईत पाेलीस दिसून येतात़ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
३ जुने रेल्वे स्थानक...
गूळ मार्केट चाैक ते जुने रेल्वस्थानक आणि गांधी चाैक हाही मार्ग एकेरी आहे. या मार्गावर आलेल्या वाहनाला परत फिरण्याची साेय नाही. परत फिरण्यासाठी पुन्हा गांधी चाैकातून गंजगाेलाईत जावे लागते. या मार्गावर राँग साईडने वाहतूक माेठी होते.
माेहीम नावालाच...
जुने रेल्वे स्थानक परिसरात शहर वाहतूक शाखेचे पाेलीस कर्मचारी कारवाईसाठी थांबतात. मात्र, हे काम नित्याचे नसते. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास ही माेहीम राबविली जाते. या मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आवर घालण्याची गरज आहे.
सुभाष चाैक परिसर...
शहरातील सुभाष चाैक, हत्ते काॅर्नर परिसरात माेठ्या प्रमाणावर राँग साईड धावणाऱ्या वाहनांची वर्दळ दिसून येते. या परिसरातही पाेलीस कर्मचारी दिसून येत नसल्याने वाहनधारकांचे धाडस वाढते. यातून छाेट्या-माेठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत.
सहा महिन्यांत दीड लाखांचा दंड
राँग साईड वाहनधारकांचा समावेश...
वाहनधारकांकडून नियमांचे माेठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे समाेर आले आहे. त्यांना ५०० ते २ हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. जानेवारी २०२० ते जून २०२१ अखेर लाखाे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने गत दीड वर्षात जवळपास १ हजार २१५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक राँग साईड वाहन चालविण्याच्या घटनांचा समावेश आहे.
कारवाईची माेहीम हाती घेतल्यानंतर राँग साईडने वाहन चालविण्याचे प्रमाण कमी हाेते. कारवाई थंडावली की, पुन्हा हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
राँग साईड वाहन चालविणे आले अंगलट...
वाहनधारक वाहन चालविताना नियमांचे पालन करत नसल्याने अपघाताच्या घटना घडतात. वेळेची बचत करण्याच्या नादात शाॅर्टकट आणि चुकीच्या दिशेचा वापर केला जाताे. राँग साईड वाहन चालविणे अनेकांना अंगलट आले आहे. ज्या-ज्या ठिकाणी पाेलीस कर्मचारी नियुक्त आहेत, तेथे अशा वाहनधारकांवर कारवाई केली जाते. यातून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाताे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर.