रयतू बाजारात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील रयतू बाजार परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. बाजारात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेलाच टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
कृषी औजारे घटकासाठी अर्ज करावेत
लातूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीत धान्यअंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिक, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतक-यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. नोंदणी करण्यासाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत मुदत असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
बंद सिग्नल सुरू करावेत
लातूर : शहरातील काही मुख्य चौकात सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असून बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, रेणापूर नाका, पाच नंबर चौक या मुख्य चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
खरिपातील पिकांना पावसाची प्रतीक्षा
लातूर : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन पडत असून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. सध्या सोयाबीनचे पीक शेंगधारणेच्या स्थितीत आहेत. मागील काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकून गेली होती. मध्यंतरी झालेल्या पावसाने पिकाला दिलासा मिळाला. मात्र, आता परत उघडीप दिल्याने पावसाची गरज आहे.