देवणी : येथील एस.टी. महामंडळाच्या नूतन बसस्थानकाचे काम दीड वर्षापासून रखडले आहे. प्रवाशांना थांबण्यासाठी छोटेसे पत्र्याचे शेड उभारण्यात आले असले तरी ते अपुरे पडत असल्याने पावसाळ्यात प्रवाशांना भर पावसात थांबून एस.टी.ची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देवणीत जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी दोन एकरांत बसस्थानक उभारले होते. त्यामुळे प्रवाशांना थांबण्याची सोय होऊ लागली. देवणी तालुका हा सीमावर्ती भागात असल्याने व येथे बैलबाजार भरत असल्याने नेहमी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेशातील प्रवाशांची लगबग असते. येथून लांब पल्ल्याच्या बसेस धावत असल्याने स्थानकात नेहमी गर्दी असते.
येथील स्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने आधुनिक सुविधांनी युक्त स्थानक बांधण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रारंभ झाला. थाटात उद्घाटन करण्यात आले. एक वर्षानंतर बांधकामास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. प्रवाशांना थांबण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे छोटेसे पत्र्याचे शेड उभारण्यात आले. दरम्यान, बांधकामासाठी पायाभरणी करून बेसमेंटपर्यंत काम करण्यात आले. मात्र, दीड वर्षापासून हे काम बंद अवस्थेत आहे.
जुनी इमारत पाडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. छोटेसे पत्र्याचे शेड असल्याने तिथे प्रवाशांना पावसाळ्यात दाटीवाटीने थांबावे लागत आहे. सध्या कोरोनाची भीती असल्याने फिजिकल डिस्टन्स राखणे आवश्यक ठरत आहे. अशा परिस्थतीत प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महिला प्रवाशांची कुचंबणा
देवणी स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. पुरुष प्रवासी उघड्यावर लघुशंका उरकत असल्याचे नेहमी दिसून येत आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
इतर स्थानकांचे काम पूर्ण
येथील बसस्थानकाच्या इमारतीबरोबरच शिरूर, अनंतपाळ आणि निलंगा येथीलही स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. सध्या तेथील बांधकाम पूर्ण झाले आहे. निलंग्यातील स्थानकातून सेवाही सुरू झाली आहे. मात्र, येथील स्थानकाचे काम कशामुळे रखडले हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, विविध संघटना, संस्थांनी या संदर्भात चौकशी केली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
कोविडमुळे अडचणी आल्या
या स्थानकाच्या बांधकामात कोविडसारख्या अडचणी आल्या आहेत. त्यामुळे काम थंड होते. आता काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल आणि काम पूर्ण केले जाईल.
- प्रदीप कोकाटे, विभागीय अभियंता, एस.टी. महामंडळ