जिल्हा वकील मंडळाच्या वतीने नवीन आयटी ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत आगरकर होते. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य ॲड. आण्णाराव पाटील, जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. सचिन पंचाक्षरी, सचिव ॲड. किरण जाधव, कोषाध्यक्ष ॲड. गणेश गोजमगुंडे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी, ग्रंथालय सचिव ॲड. दत्तात्रय पांचाळ, स्थायी समितीचे सभापती ॲड. दीपक मठपती, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर चेवले, ॲड. संभाजीराव पाटील, ॲड. जयश्री पाटील आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री असताना जिल्हा वकील मंडळाच्या मागणीनुसार डीपीडीसीच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा निधी आयटी ग्रंथालयासाठी मंजूर करून दिला होता. त्याचे उद्घाटन झाले. जनतेच्या आशीर्वादाने मिळालेले पद काम करण्यासाठी असते असे सांगून यावेळी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, पद असो किंवा नसो प्रामाणिकपणे जनहिताची कामे करणे आवश्यक असते. माझ्याकडे पद नसतानाही जिल्हा वकील मंडळाने उद्घाटक म्हणून निमंत्रित केले. ही वेगळी पावती आहे. जुन्या विश्रामगृहाच्या जागेत न्यायालयाची नवीन इमारत उभी करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. या नवीन इमारतीसाठी आवश्यक असलेला निधी व ही इमारत लवकर उभी रहावी, याकरिता आपण पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
नव्याने वकिली करणाऱ्यांना आर्थिक मदत
नव्याने वकिली करणाऱ्या वकिलांना शासनाच्या वतीने प्रतिमाह आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ॲड. आण्णाराव पाटील यांनी केली. ती रास्त असून, त्यासाठीही आपण पाठपुरावा करू. आगामी अधिवेशनात हा प्रश्न मांडला जाईल, असेही ते म्हणाले.