तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १९५ जागांसाठी ४८९ उमेदवार रिंगणात होते. २५ हजार ३४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी नऊ टेबलवर नऊ फेऱ्यांद्वारे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली. मतमोजणीसाठी ८० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
प्रत्येक उमेदवाराला अथवा त्यांच्या प्रतिनिधीला विशेष पास देण्यात आले असून त्यांनाच प्रवेश देण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाराम खरात, नायब तहसीलदार स्वामी यांनी केले आहे.
वांजरवाडा, अतनूर, घोणसीकडे लक्ष...
तालुक्यातील अतनूर, वांजरवाडा, घोणसी या मोठ्या ग्रामपंचायती असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वांजरवाड्यात चौरंगी, अतनूर आणि घोणसीमध्ये दुरंगी लढत झाली आहे. वांजरवाडामध्ये पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, भाजपाचे अविनाश नळदवार व पवार यांच्या पॅनलमध्ये जोरदार लढत झाली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे यांच्या धामणगावमध्ये चुरस झाली. मरसांगवी, रावणकोळा, सोनवळा, वडगाव, शेलदरा, कुणकी, बोरगाव, एकुर्का येथेही लक्षवेधी लढती झाल्या आहेत. सोमवारी दुपारपर्यंत निकाल हाती येणार आहे.