नागरसोगा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे भास्कर सूर्यवंशी व पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार यांच्या पॅनलचे पॅनलप्रमुखाच्या पत्नीसह आठ उमेदवार विजयी झाले होते. त्यांच्या विरोधी असलेले अशोक शिंदे यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले होते. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्याने सरपंचपदासाठी चुरस होईल, अशी आशा होती. पण बिनविरोध निवड झाली.
बुधवारी सकाळी अध्यासी अधिकारी एस.एम. चव्हाण यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतच्या नूतन सदस्यांची बैठक घेण्यात आली. सरपंच पदासाठी भास्कर सूर्यवंशी यांच्या पॅनेलकडून सरोजा भास्कर सूर्यवंशी याचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी सूर्यवंशी यांच्या पॅनलकडून बंडू मसलकर यांनी व त्यांच्या विरोधात अशोक अडसुळे यांनी अर्ज भरला. ऐनवेळी अडसुळे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने बंडू मसलकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी आर.आर. पाटील, तलाठी रोहित धावडे यांनी सहाय्य केले. यावेळी ॲड. आशिष बाजपाई, सुशीलकुमार बाजपाई, दिलीप मुसांडे, वामन शिंदे, शिवाजी फावडे, मधुकर सूर्यवंशी, दिलीपराव पाटील आदी उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.