विलास २ मांजरा परिवारात येण्यापूर्वी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने मांजरा परिवारात आता एकूण आठ कारखाने झाले असून सर्वच उत्कृष्टरीत्या चालत आहेत. यातून परिसराच्या सर्वांगीण विकासाला त्यांचा हातभार लागत आहे. विलास युनिट २ हा कारखाना खरेदीसाठी घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड मुदतीत केल्याबद्दल संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख यांनी केले.
विलास कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई देशमुख म्हणाल्या,
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातही सहकारी साखर कारखाने यशस्वी करण्याचा प्रयोग लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या उभारणीतून चालवला होता, त्यांचा तो प्रयोग यशस्वी तर झालाच. शिवाय पुढे तो देशासाठी एक आदर्श प्रयोग ठरला आहे. मांजरा कारखान्याच्या यशस्वी प्रयोगामुळे लातूर परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती. त्यातून १९९८-९९ च्या दरम्यान अतिरिक्त उसाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याकाळी नुकतेच केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून अमित देशमुख यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. यादरम्यान शेतकऱ्यांशी हितगूज करत असताना त्यांनी सदरील समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. केवळ निर्धार व्यक्त करून न थांबता सरासरी २५ वर्षे वयाच्या तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी अवघ्या ९ महिन्यांत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याने आजवर २८ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. सर्वांत कमी वयाच्या संचालक मंडळाने विक्रमी कमी वेळेत कारखाना उभा करून तो देशात आदर्श ठरावा, अशा पद्धतीने यशस्वीरीत्या चालवला आहे, या कारखान्याने दुसरा कारखाना म्हणजे आताचा विलास युनिट २ विकत घेतला असून तोही उत्कृष्टरीत्या चालवण्यात येत आहे.
उदगीर येथील प्रियदर्शनी हा कारखाना तर लातूर जिल्ह्यातील होता, शिवाय या कारखाना परिसरात माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा ही लोकनेते विलासराव देशमुख यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे प्रारंभी मांजरा कारखान्याच्या वतीने तो भाडेतत्त्वावर चालवण्यात आला; परंतु हा करार संपल्यानंतर पुन्हा तो कारखाना बंदच राहणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नंतर अमित देशमुख यांनी तो कारखाना विलास साखर कारखान्यामार्फत विकत घेण्याचा निर्णय घेतला व कारखान्याची खरेदी झाली; परंतु पुढे कारखान्याची दुरुस्ती आणि तर कामकाजासाठी कर्ज घेऊन भांडवल उभारावे लागले, अनेक अडचणींवर मात करीत आता हा कारखाना यशस्वीरीत्या चालवण्यात येत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच कारखाना उत्तमरीत्या चालवण्यात येत आहे.