किल्लारी ३० खेडी पाणीपुरवठा योजनेचा थकीत बिलपोटी वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे गावात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. गत वर्षभरात कोविड, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह, व्यापारी व नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींचा करही वसूल झाला नाही. ग्रामपंचायतीने थकीत बिलापोटी काही प्रमाणात पाणीपट्टी वसूल करून भरला आहे. मात्र, ग्रामपंचायतीने कोरोना संसर्ग उपाययोजनेवर खर्च केला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरण्यासाठी परवानगी देण्यात यावी. सदरील ३० खेडीसह इतर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत जोडणे व पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत महावितरण व पाणीपुरवठा विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी आ. अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील १६ व जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींनी मनरेगा अंतर्गत सार्वजानिक पाणीपुरवठा योजनेत खोदकामात केलेल्या जवळपास सर्व विहिरींना मुबलक पाणी आहे. सदर विहिरीवरून गावात पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोताशी विद्युत पंप जोडून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केल्यास पाणीटंचाईचे निवारण होणार आहे. त्यामुळे टंचाईअंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना सर्वच विहिरींच्या कामांना मंजुरी द्यावी, असेही निवेदनात आ. पवार यांनी म्हटले आहे.