सध्या उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे नागरिकांची दुपारच्या वेळी काहिली होत आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांची चारा- पाण्यासाठी भटकंती होत असे. त्यातून पाण्याविना तडफडून पक्ष्यांचा जीवही जाण्याची भीती असते. पक्ष्यांना सहजरीत्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून येथील ॲड. दशरथ सरवदे यांनी हा उपक्रम राबविला आहे.
रेणापूर न्यायालयाच्या परिसरात न्या. ओ.एम. माळी व न्या. यादव यांच्या हस्ते झाडांना येळण्या बांधण्यात आल्या. तिथे पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनीही आपल्या अंगणात असलेल्या झाडांना तसेच छतावर पाण्याच्या येळण्या ठेवून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे न्या. ओ.एम. माळी म्हणाले. उन्हाच्या तीव्रतेमुळे पशू-पक्ष्यांचे हाल होतात. चारा- पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. ती अडचण दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी रेणापूर वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोहन सिरसाट, सहसचिव ॲड. सतीश चोथवे, कोषाध्यक्ष ॲड. केदार, ॲड. प्रशांत अकनगिरे आदी उपस्थित होते.