संदीप शिंदे, लातूर : जिल्ह्यात कोरोना व इतर आजारांच्या रुग्णांच्या सेवेसाठी १०८ क्रमांकांच्या २० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १०८ क्रमांकांच्या या रुग्णवाहिकांना दररोज १४० हून अधिक कॉल येत आहेत. तर प्रत्येक रुग्णवाहिकेला ५ ते ७ कॉल वेटिंगवर राहत असून, रुग्णवाहिकेसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी राज्य सरकारने भारत विकास ग्रुपच्या मदतीने १०८ क्रमांकांच्या मोफत रुग्णवाहिका सुरू केल्या. या रुग्णवाहिकांमध्ये सर्व वैद्यकीय उपकरणे व डॉक्टरांची यंत्रणा सज्ज असते. सध्या जिल्ह्यात २० रुग्णवाहिका सेवा बजावत आहेत. कोरोनासह इतर रुग्णांना तत्काळ सेवा दिली जात असून, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांना कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलपर्यंत सोडविण्यासाठी दररोज १४० हून अधिक कॉल्स येत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णांना सेवा मिळत असली तरी काही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. लातूर तालुक्यात ४, औसा ४, रेणापूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, उदगीर, चाकूर तालुक्यात प्रत्येकी १, अहमदपूर २ तर निलंगा तालुक्यात ४ अशा एकूण २० रुग्णवाहिका रुग्णांना सेवा बजावत आहेत. आतपर्यंत २० हजार ५३९ कोरोसंदर्भातील रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका - २०
दररोज ग्रामीण भागातून येणारे कॉल्स - ४५ टक्के
दररोज शहरातून येणारे कॉल्स - ५५ टक्के
कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक -
जानेवारी
एकूण रुग्ण - १३७५
कोरोना रुग्ण - १७९
फेब्रुवारी
एकूण रुग्ण - १२६७
कोरोना रुग्ण - २६४
मार्च
एकूण रुग्ण - २००४
कोरोना रुग्ण - १०८९
कॉल केल्यानंतर तात्काळ सेवा देण्याला प्राधान्य...
१) जिल्ह्यात १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेवर चालक आणि प्रशिक्षित डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिकांना विशिष्ट अंतरावर थांबा देण्यात आला आहे. कॉल आल्यानंतर तत्काळ सेवा देण्यावर १०८ रुग्णवाहिकेचा भर आहे.
२) अपघात, मारहाण, जळणे, हृदयरोग, पडणे, विषबाधा, प्रसूती, विजेचा धक्का या रुग्णसेवा १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दिल्या जातात. यासोबतच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जखमींना तत्काळ सेवा देण्यासाठी या मार्गावर स्वतंत्र रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
३) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकाचालक, डॉक्टर यांची काळजी घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यातील २० हजार ५३९ कोरोना संदर्भातील रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. सध्या प्रादुर्भाव वाढत असल्याने अधिक ताण रुग्णवाहिका यंत्रणेवर पडत आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातून वाढती मागणी...
सध्या १०८ मोफत रुग्णवाहिकेला शहरासह ग्रामीण भागातून वाढती मागणी आहे. रुग्णांना तत्काळ सेवा देण्यावर आमचा भर असून, जिल्ह्यातील २० रुग्णवाहिकांवरील डॉक्टरांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या कॉल्स वाढले आहेत, असे १०८ रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. संदीप राजहंस यांनी सांगितले.