निवडणूक विभागाच्या वतीने ४०८ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ३८३ ग्रामपंचायतींमध्ये ७ हजार २८६ जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये ४ हजार २१५ महिला तर ३ हजार ७१ पुरुष उमेदवार आहेत. एकूण ६ लाख ७२ हजार ६८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये ३ लाख ५६ हजार ५२५ पुरुष तर ३ लाख १५ हजार ५४३ महिला मतदार आहेत. निवडणूक विभागाच्या वतीने ११६ क्षेत्रीय अधिकारी तर १४१ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोना नियमांचे पालन करीत मतदान होईल.
उपाययोजनांचे काटेकोर पालन
कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. केंद्रावर आरोग्य कर्मचारी, पोलीस नियुक्त असणार आहेत. ११६ क्षेत्रीय अधिकारी तर १४१ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यावर आहेत.
- गणेश महाडिक,
उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, लातूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत असून, प्रत्येक मतदारांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जाणार आहे. क्वारंटाईन असलेल्या मतदारांना मतदान करता यावे, यासाठी शेवटच्या तासात वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हँडग्लोव्हज, आरोग्य कीट वितरीत करण्यात आले आहे.वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.
सोमवारी निवडणुकीचा फैसला
१८ जानेवारी रोजी तालुकास्तरावर ग्रा.पं. निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतपेट्या ठेवण्यासाठी स्ट्राँग रुमचे नियोजन करण्यात आले आहे.