देवणी : तालुक्यातील काही गावांत प्रस्थापितांना मतदारांनी धक्का देत नवख्यांना संधी दिली आहे. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे साेमवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीवरुन स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील नागराळ, विळेगाव, तळेगाव, विजयनगर, हंचनाळ, आनंदवाडी, आंबानगर, पंढरपूर येथील ग्रामपंचायती पूर्वींच्याच प्रस्थापितांच्या हाती राहिल्या आहेत. वलांडी, भोपणी, होनाळी, अचवला, कवठाळा, देवणी खु., गुरनाळ, लासोना, बोळेगाव, आंबेगाव, नेकनाळ आदी गावांत सत्ताधा-यांना धक्का बसला असून तिथे सत्तांतर झाले आहे. याशिवाय, धनेगाव व जवळगा येथे काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित जागांवर मतदान झाले. तिथे बिनविरोध गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र कौल मिळाल्याने थोडी खुशी, थोडा गम अशी अवस्था झाली आहे.
निकालानंतर प्रत्येक राजकीय पक्षातर्फे दावे- प्रतिदावे केले जात आहेत. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मतमोजणी व्यवस्थित व पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार शेख हिसामोद्दीन, माडजे, गटविकास अधिकारी अच्युत पाटील आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, शांतता ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंगारे, पोलीस उपनिरीक्षक रणजित काथवटे यांनी चाेख बंदोबस्त ठेवला होता.