महाराष्ट्र विद्यालयात ऑनलाइन मेळावा
लातूर : मजगेनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता नववी वर्गाच्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा ऑनलाइन मेळावा घेण्यात आला. यात दहावीच्या उन्हाळी वर्गाबाबत चर्चा करण्यात आली. १० एप्रिलपासून उन्हाळी वर्ग सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक गोविंद शिंदे, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी, परीक्षा विभागप्रमुख पिचारे, सूर्यकांत चव्हाण, अरुण काळे, विनोद सूर्यवंशी आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
फळबाजारात आंबा झाला दाखल
लातूर : शहरातील फळबाजारात यंदाच्या हंगामातील आंब्याची आवक वाढली आहे. नियमितपणे मोठ्या प्रमाणात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल होत आहेत. विशेषतः बदाम जातीच्या आंब्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यासह द्राक्ष, टरबूज, खरबूज आदी फळेही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.
ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट
लातूर : शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानात काहीअंशी घट झाली आहे . वादळी वारा व हलक्याशा पावसामुळे तापमान घसरले आहे. दोन दिवसांपूर्वी उन्हाचा पारा वाढल्याने गरमी वाढली होती. मात्र, दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. शुक्रवारी सकाळी शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या त्यामुळे काहीवेळ गारव्याचे वातावरण पसरले होते.
कोरोनामुळे समर कॅम्प लांबणीवर
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील क्रीडा संकुल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे हस्ताक्षर, निबंध, डान्स, संगीत, गीतगायन आदी समर कॅम्प लांबणीवर पडले आहेत. प्रतिवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात समर कॅम्प आयोजित केले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे समर कॅम्प लांबणीवर पडले आहेत.
शहर व जिल्हाभरात विजेचा लपंडाव
लातूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहर व जिल्हाभरात विजेचा लपंडाव सुरू आहे. परिणामी नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर अनेकवेळा बत्ती गूल होत असल्याने नागरिकांना झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. महावितरणने विजेचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
श्यामनगर, विशालनगर भागात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील श्यामनगर, विशालनगर, पद्मानगर, कल्पनानगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून नालेसफाई झाली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नालेसफाईच्या मागणीसह खुल्या प्लॉटवरील कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी शहर महापालिकेच्या स्वछता विभागाकडे केली आहे.