गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. मंगळवारी दुपारी २ वा.च्या सुमारास रेणापूर शहरासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह हलकासा अवकाळी पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील काही नागरिकांच्या घरांवरील पत्रे काही वेळ हवेत तरंगत होती. तसेच झाडेही उन्मळून पडली. वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा तुटल्या तर काही ठिकाणचे विद्युत पोल तुटले आहेत. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रेणापुरातील महात्मा बसवेश्वर गल्ली, जोशी गल्ली, संभाजीनगर, बाजारपेठ आदी ठिकाणच्या विद्युततारांवर झाडे पडली. त्यामुळे शहराचा तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, देवणी येथे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात २० मिनिटे मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. येरोळ, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., निलंगा तालुक्यातील निटूर, कासार बालकुंदा, केळगाव, वलांडी येथेही काही वेळ अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंब्याचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.