लोकमत न्यूज नेटवर्क
रेणापूर : तालुक्यात आतापर्यंत खरिपाच्या ८२.७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके कोमेजून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रेणापूर तालुक्यात पेरणीयोग्य ४८ हजार ६६० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ४० हजार २५७ हेक्टरवर म्हणजे ८२.७३ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, पाऊसही कमी-जास्त प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात १६३.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदित होऊन पेरणीला सुरुवात केली होती. जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पेरणीनंतर आठ दिवसांनी पावसाने उघडीप दिल्यामुळे उर्वरित पेरण्या थांबल्या होत्या. पेरणीनंतर उगवलेली पिके दुपार धरु लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपड करत होते.
दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस होत असल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. पावसाअभावी तालुक्यातील १३ टक्के पेरण्या थांबल्या आहेत.
३६ हजार हेक्टरवर सोयाबीन...
तालुक्यात सर्वाधिक ३६ हजार ६२५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून, तालुक्यात अद्यापही १३ टक्के पेरण्या शिल्लक आहेत. दरम्यान, मूग, उडीद, भुईमूग पेरणीचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही पिके वगळता अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे, असे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात २६ मिमी पाऊस...
बुधवारी रात्री तालुक्यातील ५ मंडलांत सरासरी २६.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रेणापूर मंडलात २० मिमी, पोहरेगावात २५, पानगावात १५, कारेपूरमध्ये ५३ व पळशीमध्ये २० मिमी पाऊस झाला आहे. दि. १ जूनपासून आतापर्यंत रेणापूर मंडलात १८६ मिमी, पोहरेगावात १६३ मिमी, पानगावात १२३ मिमी, कारेपूरमध्ये १५३ मिमी आणि पळशीत १९३ मिमी असा पाऊस झाला आहे. दोन दिवसात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.