यावेळी पालकमंत्र्यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना महामारीला आपण तोंड देत आहोत. जनतेच्या जीविताला धोका होऊ नये, याकरिता राज्य शासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक जयंती उत्सव समितीने या निर्बंधांचे पालन केले आहे. संविधानाला जपणे, सुरक्षित ठेवणे आणि आंबेडकरी विचारांचा वारसा जपणे हे पाहायला आज आपण येथे आलो आहोत, असेही पालकमंत्री म्हणाले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आपली, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आंबेडकर पार्क येथे डिजिटल बोर्ड लावण्यात आला असून, आकर्षक मांडणी झाल्याने सदर फलक लक्षवेधी ठरत आहे. शहरातील आंबेडकर चौक तसेच आंबेडकर पार्क येथे भन्ते पैय्यानंद यांच्या उपस्थितीत आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पंचशील त्रिशरण ग्रहण केले. घरोघरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काहींनी बाबासाहेबांचे ग्रंथ वाचून जयंती साजरी केली.
सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने आंबेडकर पार्क परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच शहरातील डॉ. आंबेडकर चौक, शाहू चौक येथेही बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. प्रकाशनगर येथील बुद्धविहारात जयंती साजरी करण्यात आली. बुद्धविहार ते पाण्याच्या टाकीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जयंतीनिमित्त विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजळून दिसत होता.