महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या देवणी तालुक्यातील वलांडी व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत ‘अत्यावश्यक सेवे’तील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संचारबंदी लागू केली आहे. मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतरही दुकाने सुरू ठेवल्याने आढळून आले. त्यामुळे ९ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करत ६ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. ही रक्कम वसूल करण्यात आली.
येथील उदगीर-निलंगा राज्यमार्गावरील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस, महसूल, पंचायत समिती, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने येथील चौकात विनाकारण फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली. त्यात एकूण १० हजारांचा दंड मंगळवारी वसूल करण्यात आल्याची माहिती देवणी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिली.
या पथकात सपोनि. पंकज शिनगारे, वलांडी पोलीस चौकीचे पोलीस नाईक गणेश यादव, राजपाल साळुंखे, देवीदास किवंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, तलाठी अब्रार शेख, ग्रामपंचायतीचे गंगाधर विभूते यांचा सहभाग होता.
नियमांचे पालन करावे...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा नियमित वापर करावा. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांपुढील नागरिकांना सोमवार, बुधवार, शुक्रवारी लस देण्यात येत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच राणीताई भंडारे यांनी केले आहे.