शिरूर अनंतपाळ उदगीर राज्य मार्गावरील पांढरवाडी गावाजवळ दोन ठिकाणी धोकादायक वळण असून या वळण रस्त्यावर चार ठिकाणी मोठे खड्डे आहेत. एवढेच नव्हे तर राज्य मार्गालगत सरकारी विहीर सुध्दा आहे. त्यामुळे वळण रस्त्यावरील विहीरीच्या आकाराचे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहने विहीरीत कोसळून मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.किंवा विहीर चुकविण्याच्या प्रयत्नात शेजारी असणाऱ्या घरात वाहने घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होऊ शकते म्हणून या वळणावर अत्यंत सावधगिरी बाळगावी लागत आहे. त्यामुळे वळण रस्ता पार करताना वाहने संथ गतीने चालवावी लागत आहेत. यातून वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून, वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनाच्या लाबंच लांब रांगा लागत आहेत.
ऊस वाहतुकीसाठी अडचणी...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातून जागृती कारखान्यास मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक केली जाते. ट्रक, डबलट्राॅली ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून पांढरवाडी हा जवळचा मार्ग असल्यामुळे ऊसाची वाहतूक केली जाते.परंतु पांढरवाडीच्या ऐन वळणावर अत्यंत धोकादायक खड्डे पडले आहेत. त्यामुळे ऊसाची वाहने पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
चार दिवसांत खड्डे बुजविणार ...
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पवार म्हणाले, पांढरवाडीच्या वळणावरील खड्डे बुजविण्याचे काम चार दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकाचा त्रास कमी होणार आहे.