तालुक्यातील २७ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचाच्या निवडीचा कार्यक्रम तहसीलदार अतुल जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायबतहसीलदार सुधीर बिरादार, आर.एन. पत्रिके यांनी तीन टप्प्यांत पूर्ण केला आहे. त्यामुळे २७ गावांतील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी संपल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५० टक्के महिला आरक्षणानुसार १४ ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव आहेत; परंतु २७ पैकी तीन गावांच्या ग्रामपंचायतींचा कारभार पूर्णतः महिलांच्या हाती देण्यात आला आहे. तिन्ही गावांत सरपंच आणि उपसरपंच महिलाच झाल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही गावांत खऱ्या अर्थाने महिलाराज निर्माण झाले आहे.
तालुक्यातील या गावांत महिलाराज...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन गावांत सरपंच, उपसरपंच म्हणून महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांत महिलाराज निर्माण झाले आहे. यामध्ये हालकी- कांताबाई ज्ञानोबा सूर्यवंशी (सरपंच), कमलबाई वसंत पारगावे (उपसरपंच), डोंगरगाव- कालिंदा हिरानंद काळे (सरपंच), रोहिणी विशाल पाटील (उपसरपंच), कळमगाव- महानंदा शिवाजी वाघमोडे (सरपंच), स्नेहा सचिन शिंदे (उपसरपंच) यांचा समावेश आहे.