लोकमत न्यूज नेटवर्क
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत विद्यालयाला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय योजनेतून ३ लाखांचे क्रीडा साहित्य देण्यात आले आहे.
येथील नवभारत विद्यालय ही १९५८पासून ग्रामीण भागात सुरु झालेली शाळा आहे. ही शाळा जुनी असून, समाधानकारक विद्यार्थी संख्या हे निकष ग्राह्य धरून विद्यालयाला तीन लाखांचे क्रीडा साहित्य नुकतेच देण्यात आले. या क्रीडा साहित्यात थाळी, गोळा, फुटबॉल, व्हॉलिबॉल, कब्बड्डी मॅट, लेझीम, खो-खो पोल, मल्लखांब, कॅरम बोर्ड, बुध्दीबळ, हॉकीस्टिक, वजन काटा, शुटिंग बॉल, बॅडमिंटन रॅकेट असे विविध प्रकारचे साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनसोक्त खेळता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक विकास होण्यास मदत होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांचे संस्थाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक शेषेराव बिराजदार, पर्यवेक्षक परमेश्वर स्वामी, वरिष्ठ सहाय्यक संदीपान नवखंडे आदींनी या मदतीबद्दल आभार मानले आहेत.