पानगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या तीन आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक, सेविकांसह ११ पदे रिक्त असल्याने पानगाव प्राथमिक आरोग्य केद्राअंर्तगत १६ गावांच्या आरोग्य सेवेचा ताण १७ कर्मचाऱ्यांवर पडला आहे. तर मुरढव, मुसळेवाडी, पानगाव येथील उपकेंद्रातील आरोग्य सेविकाची इतरत्र बदली झाल्यामुळे आरोग्य उपकेंद्र ओस पडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे.
पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १६ गावासाठी २८ आरोग्य कर्मचारी आहेत. त्यापैकी मुरढव, मुसळेवाडी, घणसरगाव या आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्य सेवक, सेविकांची तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील लॅब टेक्निशियन व परिचर अशा ११ कर्मचाऱ्यांची बदली बदली झाली आहे. त्यामुळे पदे रिक्त असल्याने १६ गावांच्या आरोग्य सेवेचा ताण १७ आराेग्य कर्मचाऱ्यांवर पडला आहे. पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कामखेडा, मुसळेवाडी, मुरढव, घणसरगाव उपकेंद्रांचा समावेश आहे. येथील पद रिक्त असल्याने रुग्णांना उपचारासाठी चकरा माराव्या लागत असून, पर्यायाने खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
मागणी करूनही पदे रिक्तच...
सद्या साथीच्या आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रिक्त असलेल्या पदाबाबत आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री हुजरे, डॉ. यशवंत दहीफळे यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य विभागाने तत्काळ रिक्त पदे भरून रुग्णांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.