लातूर : शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिने सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड लातूरचे सहावे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.पी. मनाठकर यांनी ठोठावला आहे.
उमरगा-किल्लारीमार्गे लातूरकडे एमएच २० बीएल ०५२२ या क्रमांकाच्या बसमध्ये प्रवासी घेऊन येत असताना २ नोव्हेंबर २०१६ रोजी बसचालक गोपाळ देविदास गाडेकर व वाहक शेषेराव क्षीरसागर सिरसल पाटीजवळ कविश्वर बाबुराव मडिले (रा. किल्लारी) व रणजित एकनाथ घोडके (रा. लेबर कॉलनी) यांनी मोटारसायकलवर येऊन बस अडविली. बस चालकाला ‘तू आम्हाला कट का मारलास’ म्हणून लाथा-बुक्क्याने तोंडावर, छातीवर मारून शासकीय कामात अडथळा केला. याबाबत ३ नोव्हेंबर २०१६ रोजी बसचालकाच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय एस.सी. कोळी यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमोर बसचालक व वाहक यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य धरून सहावे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.पी. मनाठकर यांनी आरोपी कविश्वर मडिले व रणजित घोडके यांना शासकीय कामात अडथळा केल्याच्या कारणावरून सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने रमाकांत चव्हाण यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस नाईक इम्रान शेख यांनी सहकार्य केले.