लातूर : विनामास्क फिरणाऱ्यांना कोणीही अडवित नसल्याने गेल्या महिनाभरात बेफिकीरी वाढली होती. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढताच पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास गांधी चौकात मास्क न वापरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद मिळाला.
राज्याच्या काही भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस आणि महापालिका मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. रविवारी काही ठिकाणी प्रसाद मिळाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यांना मास्क दिसले. गेल्या दोन दिवसांत मास्क वापरण्याचे प्रमाणही टप्प्या-टप्प्याने वाढू लागले आहे.
चौकांसह अंतर्गत रस्त्यांवर फिरते पथक
चौकांसह अंतर्गत रस्त्यांवरही पोलीस आणि प्रशासनाच्या फिरत्या पथकाचीही आवश्यकता आहे.
महसूल प्रशासन, पोलीस व मनपाचे एकत्रित पथक प्रत्येक चौकांत, पुढील काही दिवस उभे राहिले तर मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे.
अफवांवर विश्वास नको; लाॅकडाऊन नाही
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केले आहे, सोशल मीडियावर लाॅकडाऊनच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रशासनाने लाॅकडाऊन संदर्भाने कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. चुकीच्या माहिती वा सोशल मीडियातील संदेशावर विश्वास ठेऊ नका, असे म्हटले आहे.