भांडण सोडविण्यास गेले असता मारहाण
लातूर : सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेले असता तू कोण आमचे भांडण सोडवणारा, असे म्हणून बतईने छातीवर व गालावर मारून जखमी केल्याची घटना औसा तालुक्यातील आपचुंदा येथे घडली. याप्रकरणी बबन सूर्यभान माने यांच्या तक्रारीवरून शैलेश पाटील (रा. आपचुंदा) यांच्याविरूद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. लामतुरे करीत आहेत. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
येल्लोरी येथून दुचाकी लंपास
लातूर : औसा तालुक्यातील भादा पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या येल्लोरी येथून एमएच २४ एपी ५२१७ क्रमांकाची दुचाकी शेतातील पत्र्याच्या शेडजवळून चोरीला गेल्याची घटना २० ते २१ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी भागवत नारायण खडसुरे यांच्या तक्रारीवरून भादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गिरी करीत आहेत. दरम्यान, औसा तालुक्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बीदर रोड - मादलापूर येथून दुचाकी चोरीस
लातूर : बीदररोड - मादलापूर येथून एमएच २४ एडी १३९५ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी राजेश संताजी घारे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये असून, पुढील तपास पोना. मिटकरी करीत आहेत.