शेत रस्त्यावरून भांडण; हात मोडला
लातूर : चौघांनी संगनमत करून शेतात जाण्याच्या रस्त्यावरून कुरापत काढून हातातील काठीने डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारून हात मोडला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तू जर आमच्या नादाला लागला तर जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना चवणहिप्परगा येथील शिवारात घडली. याबाबत राजेंद्र लिंबराज बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी तुळशीराम बिराजदार यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध देवणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक साळुंके करीत आहेत.
स्वाध्याय उपक्रमाला तात्पुरती स्थगितीची मागणी
लातूर : स्वाध्याय उपक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबविला जात आहे. मात्र कोरोनामुळे गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. बाल मानसशास्त्राचा विचार करता दरवर्षी साधारण २ मे ते १५ जूनपर्यंत उन्हाळी सुटीद्वारे विद्यार्थ्यांना बौद्धिक विश्रांती देऊन रिफ्रेश केले जाते. या पार्श्वभूमीवर स्वाध्याय उपक्रमाला स्थगिती द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षण परिषदेच्या संचालकांकडे केली आहे.
महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन
लातूर : भारत विकास परिषदेच्यावतीने महिलांसाठी योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ३१ मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने हे शिबिर राहणार आहे. शिबिर मोफत असून, कोरोनामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. प्रत्येकजण चिंतेत आहेत. भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. या स्थितीत शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी योग व प्राणायाम महत्वाचे आहे. त्यामुळे खास महिलांसाठी ३१ मेपर्यंत सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत शिबिर घेतले जाणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात जयंती
लातूर : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत चोपले, रंगनाथ माळी, बिटाजी भोसले, सुनील आगलावे आदींची उपस्थिती होती.
सदाचारानेच माणसाचे कल्याण : केशव कांबळे
लातूर : बौद्ध नगर येथील वैशाली बुद्ध विहारात महात्मा गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेला धुपाने, दीपाने वंदन करण्यात आले. यावेळी केशव कांबळे म्हणाले, तथागताचा धम्म हा पूजेच्या कर्मकांडाचा नसून तो आचरणाचा आहे. संसारिक माणसाने सुखाने जगण्यासाठी सदाचाराचा अंगिकार केला पाहिजे. प्रत्येक माणूस सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हिंसा, चोरी, खोटे बोलणे, व्यभिचार, नशापाणी या वाईट गोष्टींचा त्याग करावा. पंचशील तत्वात भगवान बुद्धांनी सांगितलेले विचार अंगिकारावेत, असेही ते म्हणाले. यावेळी पृथ्वीराज सिरसाट, एच.एस. गायकवाड, दामू कोरडे, सूर्यभान लातूरकर, उदय सोनवणे, लता चिकटे, लता गायकवाड, विलासबाई घनगावे, मीना सुरवसे आदींची उपस्थिती होती.
गरजूंना अन्नदान, कपड्यांचे वाटप
लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त धर्मवीर औदुंबर बट्टेवार-पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील गरजूंना अन्नदान व कपड्यांचे वाटप करण्यात आले. काँग्रेस भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला ॲड. किरण जाधव, ॲड. समद पटेल, ॲड. देवीदास बोरुळे-पाटील, संस्थेचे अध्यक्ष अविनाश बट्टेवार आदींची उपस्थिती होती.