महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचा विषय चिघळला, निर्णय झाल्याशिवाय काम नाही

By आशपाक पठाण | Published: June 26, 2023 08:19 PM2023-06-26T20:19:39+5:302023-06-26T20:19:53+5:30

महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

The issue of transfer of request of revenue staff became heated, there is no work until a decision is taken | महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचा विषय चिघळला, निर्णय झाल्याशिवाय काम नाही

महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचा विषय चिघळला, निर्णय झाल्याशिवाय काम नाही

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत विनंती बदल्या नाकारण्यात आल्याने संघटनेने सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी दिवसभर तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. कर्मचारी होते पण काम करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

काेरोनामुळे मागील दोन वर्षांत कर्मचाऱ्यांच्या कसल्याच प्रकारच्या बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण प्रतीक्षेत आहेत. पुढील वर्षी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागू होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षीही बदल्या होणे अपेक्षित नाहीत. लातूर जिल्ह्यातील अव्वल कारकून, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई संवर्गातील दिव्यांग, वैद्यकीय कारणावरील व महिला कर्मचारी यांच्या अडचणीबाबत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून विनंती बदल्या कराव्यात, अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे. बदल्यावर निर्णय होत नसल्याने आता कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, वाहनचालक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव पांचाळ, सरचिटणीस सुधीर बिराजदार, कार्याध्यक्ष मंजूर पठाण, कोषाध्यक्ष विवेक स्वामी आदींची नावे आहेत.

कामबंद आंदोलनाचा विद्यार्थ्यांना त्रास...
कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केल्याने आठ दिवसांपासून विविध प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी फटका बसला. अनेक प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. शाळा, महाविद्यालयाचे प्रवेश सुरू असल्याने वेळेत प्रमाणपत्र शाळेत सादर करणे आवश्यक आहे. संघटनेच्या आंदोलनामुळे विद्यार्थी, पालकांची गैरसोय झाली आहे. किमान शाळा, महाविद्यालयासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी तरी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे.

Web Title: The issue of transfer of request of revenue staff became heated, there is no work until a decision is taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर